रांजणगाव गणपती -कारेगाव (ता. शिरुर) येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना प्रेयसी गर्भवती राहिली. पण आम्हाला बाळ नको होते. त्यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. शुक्रवारी (दि. 14) त्यांच्यामध्ये भांडण झाले तर शाररिक संबंध ठेवताना प्रेयसी अपमानकारक बोलल्यामुळे प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून केला. यानंतर प्रियकर स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रियकरावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सोनामनी कान्हू सोरेन (वय 24) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. किरण फुंदे (रा. कारेगाव, ता. शिरूर) असे अटकेत असलेल्याचे नाव आहे. तर पोलीस शिपाई विजय शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी किरण फुंदे घाबरलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी तेथे अंमलदार म्हणून पोलीस नाईक गणेश सुतार व मदतनीस विजय शिंदे होते. त्यावेळी तो म्हणाला की, मी डिप्रेशनचा रूग्ण आहे, मला कागद आणि पेन द्या. मी माझ्या प्रेयसीचा गळा दाबून खून केला आहे. मला फाशी द्या, असा मजकूर लिहून तो कागद पोलिसांकडे दिला.
तसेच मी घराला कुलूप लावून आलो आहे, असे सांगत घराची चावी पोलिसांकडे दिली. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस गेले असता एक 24 वर्षीय युवती मृत अवस्थेत आढळून आली. फुंडेकडे अधिक चौकशी केली असता तो म्हणाला की, मी व माझी प्रेयसी गेले 4 ते 5 महिन्यांपासून कारेगाव येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. त्यावेळेस माझी प्रेयसी गर्भवती राहिली.
परंतु, आम्हाला ते बाळ नको होते. तर गर्भपात करण्यास भरपूर पैसे लागणार होते. आमच्याकडे पैसे नसल्याने आमचा कायम वाद होत होता. त्यातच शुक्रवारी सोनामनी अपमानकारक बोलल्याने तिचा गळा आवळून तिचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.