मुंबई – राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने ‘मुंबई फेस्टिव्हल’ ची घोषणा केली आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन, मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष उद्योजक आनंद महिंद्रा आणि पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी नुकताच मुंबई फेस्टिव्हलचा लोगो, “सपनों का गेटवे’ प्रकाशित केला.
तसेच प्रख्यात संगीतकार शमीर टंडन यांनी संगीतबद्ध केलेल्या थीम सॉंगचेदेखील लोकार्पण केले गेले. गाण्यातून मुंबईची असीमित ऊर्जा आणि विविधतेत नटलेल्या एकतेचे दर्शन घडून येते.
20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत सुरू होणारा नऊ दिवसांचा मुंबई फेस्टिव्हल “प्रत्येक जण आमंत्रित’ या थीमसह एकतेची भावना दर्शवेल. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत कार्यक्रम, खाद्य महोत्सव आणि बरेच कार्यक्रमांची रेलचेल असेल.
मुंबई फेस्टिव्हल 2024 लॉंचिंग आणि घोषणा समारंभात बोलताना राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, महाराष्ट्र शासनद्वारे मुंबईच्या विविध पैलूंना साजरे करण्यासाठी मुंबई फेस्टिव्हल 2024 चे आयोजन केले जात आहे.
हा उत्सव मुंबईकरांच्या भावना आणि शहराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम एकत्र आणणारा आहे. पर्यटनाला चालना देणे, विकास आणि सर्वसमावेशकता जोपासणे आणि उद्योगात नवीन संधी आणि मार्ग निर्माण करणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.