धरणातून मुळा नदीत 12 हजार क्युसेकने विसर्ग सुरू
पिरंगुट- मुळशी धरण भागात पडत असलेल्या संततधार पावसामुळे आज सकाळी मुळशी धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे दुपारी बारा वाजल्यापासून मुळा नदीत बारा हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
गेल्या दहा – बारा दिवसांपासून मुळशी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. धरण भाग व ताम्हिणी परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. 15 ऑगस्ट रोजी धरण 84 टक्के भरले होते. त्यामुळे 16 ऑगस्ट रोजी सकाळी एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढले असून धरण पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी धरण 100 टक्के भरले. यामुळे सकाळी आठ वाजता धरणातून 7325 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पावसाचा जोर कायम असल्याने दुपारी बारा वाजता विसर्गात वाढ करून तो 12,000 क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार यात वाढ केली जाऊ शकते, असे टाटा पॉवर प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान मुळशी धरणातून मुळा नदीत पाणी सोडल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीच्या प्रवाह क्षेत्रात जाऊ नये. तसेच योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.