मुक्ताईनगर – संत मुक्ताबाई संस्थान, कोथळी – मुक्ताईनगर यांच्या वतीने दिला जाणारा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार दैनिक सकाळचे वरिष्ठ उपसंपादक शंकर टेमघरे यांना जाहीर झाला आहे. संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी पुरस्काराची घोषणा केली. संत मुक्ताबाई यांच्या पालखीने आज मुक्ताईनगर येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले या पार्श्वभूमीवर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे आणि विश्वस्त उपस्थित होते.
ॲड पाटील म्हणाले, संस्थानचे संस्थापक अध्यक्ष स्व. भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी सांप्रदायातील एका पत्रकाराला 2019 पासून “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. 2019 चा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांना देण्यात आला होता. त्यानंतर कोरोनामुळे सलग दोन वर्षे या पुरस्काराचे वितरण करता आले नाही.
हा पुरस्कार आषाढी एकादशीच्या दिवशी रविवार (दि. 10 जुलै 2022) रोजी दुपारी 2 वाजता श्री संत मुक्ताबाई संस्थान मठ, पंढरपूर येथे देण्यात येणार आहे. टेमघरे हे 1996 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत आहेत. साप्ताहिक शिवतेज, अलंकापुरी, दैनिक लोकसत्ता, देशदूत, ऐक्य, पुढारी, सकाळ या दैनिकांत काम करीत असून संत साहित्याचा त्यांचा अभ्यास आहे. 1996 पासून वारीचे वार्तांकन करीत आहेत. वृत्तपत्र व टीव्ही वाहिनीवर वारी विशेष मालिकेचे संकल्पना, संशोधन, लेखन करीत आहेत. त्यांनी संत नामदेव महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेमभंडारी आणि ज्ञानभंडारा या पुस्तकांचे लेखन केले आहे.