पुणे – हॉटेल डेक्कन रॉयल येथे रिजनल अॅडव्हरटायझिंग मार्केटिंग असोसिएशनची सप्टेंबर महिन्याची सभा शनिवार दि. 9 सप्टेंबर रोजी पार पडली. या सभेत मावळते अध्यक्ष श्री. विजय कोलते (पुरंदर पब्लिसिटी) यांनी नूतन अध्यक्ष श्री. दिनकर शिलेदार यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली. या प्रसंगी श्री. पांडुरंग सांडभोर, दै. पुढारीचे बातमीदार यांची पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
चौथ्यांदा अध्यक्षपद भूषवणार्या श्री. दिनकर शिलेदार यांनी प्रास्ताविक करताना येत्या वर्षात रामातर्फे विविध कार्यक्रम हाती घेणार असल्याचे जाहीर केले. रामाच्या सभासदांसाठी सुप्रसिध्द जाहिरात फिल्मचे निर्माते श्री. अभिनय देव, मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द व्यक्ती श्री. रवि जाधव यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचे सांगितले. रामाचे सभासद श्री. प्रकाश बंग यांनी निम्म्याहून अधिक जग पालथे घातले असून अप्रतिम फोटोग्राफी केली आहे त्याचे लवकरच प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
फोटोच्या विक्रीतून येणार्या पैशाचा विनियोग विधायक कार्यासाठी करण्याचे योजिले असून रामा या संस्थेला बळकटी आणण्याचे जाहीर केले आहे. तर पुण्यातील जाहीरात विश्व आणि त्यांच्या संलग्न संस्थांच्या मालकांना सभासदत्व देऊन रामाच्या सभासदांची संख्या दीडशेपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. राहुल शिलेदार यांनी डिजीटल मिडियाचे युग आले असून देखील पुढील काही वर्षे न्युज पेपर मिडियाला धक्का लागणार नाही असे बोलून दाखवले.
या विषयावर आपले सखोल विचार मांडले. ज्याचा सर्व सभासदांना चांगल्या प्रकारे फायदा होईल याची त्यांनी काळजी घेतली होती. पायल अॅडव्हरटायझिंगचे श्री. विनीत पारनाईक यांची उपाध्यक्ष तर रिव्हेल अॅडव्हरटायझिंगचे श्री. महेश घोरपडे यांची सचिव पदी निवड करण्यात आली.