सुनबाईची शिवसेनेशी जवळीक; सासरे अडचणीत

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते विजय कोलते यांचे विरोधक झाले सक्रिय

– एन. आर. जगताप

सासवड – रश्‍मी बागल कोलते यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेमुळे पुरंदर तालुक्‍यात खळबळ उडाली असून सध्या तालुक्‍यातील नागरिकांमध्ये याबाबतीत मोठी चर्चा रंगली आहे. रश्‍मी बागल सध्या करमाळा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आहेत. कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते यांच्या त्या सुनबाई आहेत. शिवसेना प्रवेशामुळे सुनबाईना कदाचित विधानसभेचे तिकीट मिळेलही मात्र, त्यांचे सासरे विजय कोलते यांना पक्षातील विरोधक अडचणीत आणू शकतात.

बागल या सध्या शिवसेनेच्या संपर्कात असून शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांशी त्यांची चर्चा व गाठीभेटी सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. सध्या पुरंदर तालुक्‍यात राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा रंगली आहे. 2019 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपा-शिवसेनेच्या वाटेवर आहेत. असे असताना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील तरुण नेत्या रश्‍मी बागल शिवसेनेच्या वाटेवर आहेत. करमाळा विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढण्याचा रश्‍मी बागल यांचा इरादा आहे. त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली असून येत्या काही दिवसांतच त्या शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्‍यता विश्‍वसनीय सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

रश्‍मी बागल या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी सोशल मीडियाद्वारे दिली असल्याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्यांच्या सुनबाई जर विरोधी पक्षाच्या वाटेवर असतील तर विजय कोलते यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील भुमिके बाबत व पक्षनिष्ठेवरही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नेते शंका उपस्थित करीत आहेत. एकंदरीत सुनेच्या धाडसी निर्णयामुळे विजय कोलते यांच्यावर मात्र टिकेची झोड उठली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजय कोलते यांना भरभरून दिले आहे. मध्यंतरीच्या काळात विजय कोलते आणि पवार कुटुंबीय यांच्यात काही मतभेद व बेबनाव झाल्याची देखील चर्चा होती. त्यामुळेच विजय कोलते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर कार्यक्रमांपासून दूर राहत होते.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी विजय कोलते यांना प्रवक्ते पद बहाल करून सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत निवडणुकीतील विजय निश्‍चित केला होता. कोलते काही काळ पक्षापासून दूर गेल्यामुळे त्यांच्या बाबतीत पक्ष अंतर्गत एक विरोधी गट सक्रिय झाला होता.

पुरंदरची राजकीय समीकरण बदलणार का?
रश्‍मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पुरंदर तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलणार का? असा प्रश्‍न आता सध्या निर्माण झालेला आहे. रश्‍मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्या पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघावर ही दावा करू शकतात व पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवू शकतात, अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्‍यातील शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×