पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- राज्यसभेवर बिनविरोध खासदरपदी निवड झाल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी सक्रीय झाल्या असून, शनिवारी त्यांनी जिल्ह्यातील पालखी मार्गाची कामे आणि चांदणी चौकातील दुरुस्ती कामांचा आढावा घेतला.
पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गातील काही महत्त्वाचे टप्पे पुणे जिल्ह्यातून जातात. या मार्गात अंतिम टप्प्यात असलेली कामे ३० मेपूर्वी पूर्ण व्हावीत, अशा सूचना यावेळी त्यांंनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या. प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, वारकरी संप्रदाय महाराष्ट्र अध्यक्ष ह.भ. प. मारुती महाराज कोकाटे, अभियंता सौरभ गांधी, व्यवस्थापक अभिजीत औटे, डी.श्रीनिवास राव, किशोर भावेकर आदी उपस्थित होते.
महामार्गावरील अनेक कामे पूर्ण होत आली असून, ती लवकर पूर्ण व्हावीत. वारकरी संप्रदायाला कोणताही अडथळा होणार नाही. तसेच चांदणी चौकातील पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पूल आवश्यक असून, काही दिशादर्शक फलक संभ्रम निर्माण करणारे आहेत. तेही त्वरित दुरुस्त करण्यात यावेत, यासाठी कुलकर्णी यांनी सूचना दिल्या.
भूसंपदानासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांंना भेटणार
अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहण, जागा मालकांचे प्रश्न बाकी असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हे प्रश्न मांडणे गरजेचे आहे. यासाठी दि. ५ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार असल्याचे खासदार कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.