पुणे – श्री गुरू नानकजी यांची जयंती साधू वासवानी मिशनतर्फे साजरी करण्यात आली. यावेळी मोदीखाना या उपक्रमासह भजन, सत्संग, दादा जे.पी. वासवानी आणि साधू वासवानी यांचे ध्वनिमुद्रित प्रवचन आयोजित करण्यात आले.
मोदीखाना या उपक्रमात भक्त धान्य खरेदी करतात, जे गरीब आणि गरजू कुटुंबांमध्ये वितरीत केले जाते. श्री गुरू नानकजी यांनी सर्वप्रथम हा उपक्रम आयोजित केला होता. त्यांच्या स्मरणार्थ साधू वासवानी मिशनमध्ये मोदीखाना उपक्रम राबवला जातो. गुरु नानक जयंती या उत्सवाची सुरुवात सकाळच्या प्रार्थनेने झाली. दुपारच्या सत्रात, संपूर्ण शहर आणि इतर ठिकाणांहून भाविक जमले आणि गुरु नानक यांच्या स्तवनपर भजन आणि कीर्तनात सामील झाले.
यापाठोपाठ, गुरू लंगर आणि प्रार्थनेने सत्राची सांगता झाली. यावेळी भाविकांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. मोदीखाना उपक्रमात एकूण २ लाख २५ हजार रुपये संकलित झाले. त्याचे धान्य सुमारे १५० कुटुंबांना वाटप करण्यात आले.