नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये भाजपसाठी एकूण 7 दिवस प्रचार केला. त्या कालावधीत त्यांनी सुमारे 3 हजार जणांची भेट घेतली. त्यामध्ये भाजपच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांबरोबरच विविध क्षेत्रांतील काही मान्यवरांचा समावेश होता.
कर्नाटकमध्ये मोदींनी 18 सभा घेतल्या. त्याशिवाय, त्यांचे 6 रोड शोही झाले. प्रचाराच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहचले. त्या बरोबरच मान्यवरांशी आणि काही कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यावरही त्यांनी भर दिला. तो संवाद बराचसा व्यक्तिगत स्वरूपाचाच होता. याआधीही आपला संवाद झाला असल्याची आठवण काहींनी मोदींना करून दिली. काही कार्यकर्त्यांनी मोदींसमवेत त्यांच्या वडिलांनी कार्य केले असल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
ओळखीचा कार्यकर्ता भेटल्यानंतर मोदींनी त्याच्या समवेत कुटूंबीयांचीही विचारपूस केली. मोदींशी संवाद साधल्याने कार्यकर्त्यांचे भाजपबरोबरचे बंध अधिकच घट्ट होतात. एखाद्या सभेआधी किंवा सभेनंतर मोदी आवर्जून जनतेशी संवाद साधतात. विमान प्रवासावेळीही मोदींचा तो संवाद सुरू असतो, अशी माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली.