मंचर- आंबेगाव विधानसभा निवडणुकीत मनसे, जनता दल सेक्युलर आणि एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने एका जागेसाठी 6 उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र सोमवारी (दि. 7) स्पष्ट झाले.
घोडेगाव येथील तहसील कार्यालयात सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यत मनसेकडून वैभव दत्तात्रय बाणखेले, जनता दलाकडून (सेक्युलर) नाथू हरिभाऊ शेवाळे, अपक्ष उमेदवार अशोक दत्तात्रय काळे पाटील यांनी माघार घेतली. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे राजाराम बाणखेले, अपक्ष अनिता शांताराम गभाले, बहुजन समाज पार्टीकडून रवींद्र बाबुराव चव्हाण, भारतीय नवजवान सेनेकडून संजय लक्ष्मण पडवळ, राईट टू रिकॉल पार्टीकडून विशाल पोपट ढोकले हे निवडणूक रिंगणात आहेत. नामनिर्देशन पत्राच्या छाननीमध्ये मंगलदास बांदल, अरुण गिरे व ऍड. लक्ष्मण डामसे यांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे आता एका जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात असणार आहेत.