पुणे – देशातील “करोना हॉटस्पॉट’मध्ये पुणे जिल्हा आणि शहराची गणती अनलॉकनंतर होऊ लागली होती. देशात रुग्ण वाढीचा सर्वाधिक पुण्यात झाला होता. गेल्या आठवड्यापासून हा वेग घटला असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात राबवलेल्या “मिशन झिरो’ हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे यातून निदर्शनास येत आहे.
देशातील हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव आणि धारावीत करोनाला रोखण्यात “मिशन झिरो’ यशस्वी ठरला होता. पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि महापालिकेतर्फे “मिशन झिरो पुणे’ उपक्रम राबवला जात आहे. दि.23 जुलैपासून शहरातील 11 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उपक्रमाला सुरुवात झाली. बीजेएसच्या टीमला 2 ऑक्टोबरपर्यंत 27361 रॅपिड ऍन्टीजेन टेस्टद्वारे 5599 रुग्ण शोधण्यात यश आले. यामुळे हॉटस्पॉटमध्ये स्प्रेड कमी होण्यास मदत झाली. शहरात सध्या नवीन रुग्णापेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची सख्या दररोज वाढत आहे.
शहरातील हॉटस्पॉटमध्ये ठरलेल्या भागात जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासण्या करून रुग्ण शोधणे, रॅपिड ऍक्शन प्लॅन तयार करणे, फिरत्या दवाखान्यांची संख्या वाढवणे, करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करणे, रिपोर्ट लवकर उपलब्ध करून देणे आणि पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार या सूत्रांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हा उपक्रम यशस्वी ठरत आहे.
देशातील प्रत्येक आपत्तीकाळात काम करण्याचा अनुभव गेल्या 35 वर्षांपासून
भारतीय जैन संघटनेकडे आहे. करोना रुग्णसंख्या सर्वाधिक असलेल्या मालेगाव, धारावीत मिशन झिरो उपक्रम यशस्वी ठरला. सर्वांनी गाफील न राहता करोनाला हद्दपार करण्यासाठी या पुढेही एकत्रित प्रयत्न करावेत, असे उपक्रमाबाबत बोलताना भारतीय जैन संघटनेचे संथापक-अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी सांगितले.