– माधव विद्वांस
टाटा स्टीलचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच कुशल प्रशासक, राजकारणी रुसी मोदी तथा रुस्तमजी होमुसजी मोदी यांचा आज स्मृतिदिन. (जन्म 17 जानेवारी 1918). त्यांचे वडील होमुसजी मोदी हे पण टाटा उद्योग समूहात व्यवस्थापकीय संचालक होते, तसेच ते उत्तर प्रदेशचे राज्यपालही होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण दिले. त्यांनी रुस्तमजी मोदी यांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. त्यांनी तेथे सेंट सायप्रियन स्कूल, हॅरो स्कूल आणि नंतर क्राइस्ट चर्च तसेच ऑक्सफर्ड येथे शिक्षण घेतले.
ते न्याहारीसाठी 16 अंडी खायचे असे सांगितले जाते. त्यांना संगीताची आवड होती ते पियानोही वाजवायचे.
ऑक्सफर्डमधील त्यांच्या वास्तव्यात ते अल्बर्ट आइनस्टाइन यांना व्हायोलिनवर साथ देत असत. भारतात परतल्यावर ते वर्ष 1939 मध्ये टाटा स्टीलमध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांना वर्ष 1953 मध्ये मनुष्य संसाधन संचालक पदावर बढती मिळाली. त्यांनी वर्ष 1965 मध्ये टाटा कंपनीच्या कच्च्या मालविभागाचे संचालकपद स्वीकारले. वर्ष 1970 मध्ये त्यांची संचालन संचालक म्हणून नियुक्ती झाली आणि वर्ष 1972 मध्ये ते सहव्यवस्थापकीय संचालक झाले. त्यांनी टाटा स्टीलच्या सर्व विभागीय व्यवस्थापकांना उत्तेजनार्थ अनेक पुरस्कार सुरू केले. टाटा स्टील कारखान्यात त्यांना कधीही संपाचा सामना करावा लागला नाही. प्रसिद्ध वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी बांधलेले टाटा समूहाच्या संग्रहालयास रुस्तम मोदी यांचे नाव देण्यात आले आहे.
त्यांच्या बाबतीत एक मजेशीर किस्सा सांगितला जातो. त्यांनी एकदा एका अरुंद रस्त्यावर त्यांची गाडी उभी केली होती. तेवढ्यात तेथे एक पोलीस आला व ओरडून म्हणाला, हा तुझ्या बापाचा रस्ता आहे का? त्यावर त्यांनी त्या रस्त्याचा नाम फलक दाखविला त्यावर त्यांच्या पित्याचे नाव होते. टाटा स्टीलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनाही निवडणूक लढवण्याची इच्छा झाली व त्यासाठी वर्ष 1998 च्या निवडणुकीमधे त्यांनी जमशेदपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस हायकमांडकडे उमेदवारी अर्ज पाठवला होता; परंतु त्या जागेवर पाटमाडा येथील घनश्याम महतो यांना तिकीट मिळाल्याने ते निराश झाले.
त्यानंतर ते आदित्यपूर येथे तत्कालीन मजूर नेते डॉ. एम. के. अखौरी यांच्याकडे गेले. त्यांना त्यांनी मला अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची आहे, तुम्ही लोक मदत करा अशी विनंती केली. त्यांचे सहकार्य लाभले आणि संपूर्ण निवडणुकीत मदतही केली. त्यावेळी त्यांना ढोल हे निवडणूक चिन्ह मिळाले. ते स्वतः गळ्यात ढोल अडकवून पायी फिरत प्रचार करायचे. एवढा मोठा माणूस ढोल बांधून फिरतो याचे लोकांना कौतुक वाटायचे. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीचे निकाल आले तेव्हा आभा महतो यांना 2,96,686 आणि रुस्तम मोदी यांना 1,99,253 मते मिळाली. रुस्तम मोदी यांना वर्ष 1989 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे कोलकाता येथे 16 मे 2014 रोजी निधन झाले.