वाई,(प्रतिनिधी) – वाई विधानसभा मतदारसंघाची प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज झालेली असून आज एकूण ४५४ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करण्याचे आवाहन वाई उपविभागाचे उपविभागीय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ८९ क्षेत्रीय अधिकाऱयांची नियुक्ती केलेली असून सुमारे २१०० मतदान अधिकारी-कर्मचारी लोकसभा मतदान पार पाडण्यासाठी कर्तव्यावर नियुक्त आहेत.”नोटा” सहित एकूण १७ उमेदवार असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर २ बॅलट युनिट, १ कंट्रोल युनिट आणि १ व्हीव्हीपॅट असा मतदान यंत्रांचा संच असेल. परिणामकारक पर्यवेक्षणासाठी २५२ मतदानकेंद्रांचे लाईव्ह वेबकास्टिंग केले जाणार आहे.
मतदार संघातील १८ दुर्गम मतदान केंद्रांशी संपर्क करण्यासाठी पोलीस विभागाची वायरलेस यंत्रणा कार्यान्वित केली असून येथे मतदानाची दर दोन तासांची आकडेवारी घेण्यासाठी ३६ रनर्स नेमलेले आहेत. क्षेत्रीय अधिकारी यांना साहाय्य करण्यासाठी १२ शीघ्र प्रतिसाद पथके गठीत केली आहेत. मतदान कर्मचारी व अधिकारी यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी व परत येण्यासाठी ६१ एसटी बसेस, ११ मिनीबस व १३५ जीपगाड्यांची व्यवस्था आहे.
दिव्यांग मतदार असलेल्या मतदान केंद्रांवर व्हील चेयर्सची सुविधा पुरवली जाणार असून सोबतच आरोग्य पथके सज्ज केली असून प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान कर्मचारी यांच्यासाठी जेवण, फळे, बिस्किट्स, साबण इ. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा केला आहे. मंगळवार सकाळी ५:३० वाजता उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत अभिरूप मतदान (मॉकपोल) घेतल्यानंतर सकाळी ७ वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू होईल.
मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून सुविधा
सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहेत. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. जे कर्मचारी याच मतदार संघात कर्तव्यावर आहेत त यांच्या मतदानासाठी ईडीसी मतदान सुविधा उपलब्ध केली आहे. गरजेनुसार मतदान केंद्रांवर उन्हापासून बचावासाठी मंडप उभारण्यात आलेले असून प्रत्येक प्रत्येक केंद्रावर पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.