पुणे – मेट्रो पुण्याची आहे. पण, त्यासाठी कामगार भरतीच्या जाहिराती बिहारच्या वर्तमानपत्रात कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करत विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला. तसेच स्थानिक वर्तमानपत्रांत जाहिराती देऊन पुणे मेट्रोमध्ये प्रथम भूमिपूत्रांनाच प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी मेट्रो प्रशासनाला दिल्या.
शिवाजीनगर येथील पुणे मेट्रो प्राधिकरण कार्यालयाला भेट देत दानवे यांनी शुक्रवारी कामाचा आढावा घेतला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, माजी सहसंपर्क प्रमुख व नगरसेवक प्रशांत बधे, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे तसेच मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
“पुणे मेट्रो प्रकल्प खूप आधी होणे अपेक्षित होते. मात्र, आज जे या कामाचे भांडवल करतात, त्यांनीच मेट्रोला विरोध केला होता. आता हेच लोक दोन किलोमीटर कामाच्या उद्घाटनाला पंतप्रधानांना बोलवतात. असो…ज्याचा त्याचा प्रश्न,’ असे म्हणत दानवे यांनी भाजपला टोला लगावला. दरम्यान, “मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर, संभाजी उद्यान अशी एकेरी नावे न देता “छत्रपती शिवाजीनगर’, “छत्रपती संभाजी महाराज उद्यान’ अशी नावे द्यावीत,’ अशा सूचनाही दानवे यांनी दिल्या.
..अन् चंद्रकांत मोकाटे भडकले
“मेट्रो डेपोसाठी दोन ठिकाणी जागा दिली आहे. त्यात कोथरूडला आम्हाला कचरा डेपोत टाकून दिले,’ असे मेट्रोचे अधिकारी म्हणताच माजी आमदार चंद्रकांत मोकाटे भडकले. “कचरा डेपो काय? तो केव्हाच फुरसुंगीला नेला. आताच्या जागी शिवसृष्टी होणार होती. मेट्रोमुळे ती झाली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बैठकीत सामंजस्याने ही मोक्याची जागा तुम्हाला दिली. माहिती देताना नीट द्या. तुमचा एकही वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित नाही,’
अंबादास दानवे म्हणाले…
- 30 स्टेशनपैकी केवळ 7 ठिकाणी पार्किंग व्यवस्था
- रेंगाळलेली कामे गतीने पूर्ण व्हावी
- प्रस्तावित मार्गांची कामे तत्काळ सुरू करण्यात यावी
- प्रवासी संख्या वाढवण्यावर भर द्यावा