पुणे : ज्युदोचा प्रसार आणि प्रचार अधिक गतीने होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंची संख्या वाढवण्यासाठी पुनीत बालन ग्रुप आणि महाराष्ट्र ज्युदो संघटना यांनी सामंजस्य करार केला आहे.
या करारामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंची संख्या वाढेल आणि राष्ट्रीय स्पर्धांना सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना अनेक सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. ज्याचा परिणाम खेळाडूंच्या गुणवत्तेवर होईल, असा विश्वास उद्योजक पुनीत बालन यांनी व्यक्त केला.
ज्युदो संघटनेच्या वतीने या करारावर संघटनेचे महासचिव शैलेश टिळक आणि सचिव दत्ता आफळे यांनी स्वाक्षरी केली. तसेच महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्या वतीने पुनीत बालन यांची सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली. या कराराची मुदत तीन वर्षे असून राज्यातील दूरस्थ भागातील ठिकाणी विविध राज्य ज्युदो स्पर्धांचे आयोजन या आर्थिक सहकार्याने शक्य होईल. तेथील खेळाडूंना नव्या संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे मत शैलेश टिळक यांनी व्यक्त केले.