पिंपरी -पत्नीने पतीला त्याच्या आई-वडिलांपासून वेगळे होण्यासाठी दमदाटी केली. लोकांसमोर पतीला मारहाण करून पतीचा छळ केला. या प्रकाराला कंटाळून पतीने आत्महत्या केली.
राजू हनुमंत चव्हाण (वय 25) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या नातेवाईक महिलेने गुरुवारी (दि. 23) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू यांची पत्नी, महादेव अंकुश वाघमारे आणि अन्य दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांनी त्यांच्या आई-वडिलांपासून विभक्त राहावे, यासाठी आरोपींनी त्यांना वेळोवेळी दमदाटी केली. पत्नीने राजू यांना लोकांसमोर अपमानित करून गालात चापट मारली. राजू यांचा मानसिक छळ केल्याने राजू यांनी राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.