श्रीनगर – पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. मात्र, याच ट्विटमध्ये त्यांनी विनाकारण भारताशी संबंधित एक मुद्दा उपस्थित करून वाद ओढवून घेतला आहे.
सुनक यांच्या रूपाने पहिला भारतीय वंशाचा व्यक्ती ब्रिटनचा पंतप्रधान होतो आहे ही अभिमानाची बाब आहे. भारतात त्यामुळे जल्लोष केला जातो आहे. मात्र, त्याचवेळी आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की, एकीकडे ब्रिटनने त्यांच्या देशातील अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तीला पंतप्रधान म्हणून स्वीकारले आहे तर दुसरीकडे भारत मात्र अजूनही एनआरसी आणि सीएए सारख्या भेदभावपूर्ण कायद्यांमध्ये अडकलेला आहे, असे मेहबुबा यांनी ट्विट केले आहे.
थोडक्यात, सुनक यांच्या निवडीचा संबंध त्यांनी भारतातील या दोन कायद्यांशी लावला आहे व सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या विधानाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले आहेत. त्यांच्यावर टीका केली जाते आहे.
प्रख्यात कवी आणि वक्ते व एकेकाळी आम आदमी पक्षाचे आघाडीचे नेते राहिलेले कुमार विश्वास यांनी मेहबुबा यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांना मेहबुबा यांचा बुआ म्हणजे आत्या असा उल्लेख करून भारतात अल्पसंख्याक समुदायातील कोणीकोणी कोणते पद भूषवले याचे मेहबुबा यांना स्मरण करून दिले.
डॉ. जाकीर हुसेन, फकरूद्दीन अली अहमद, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. मनमोहन सिंग आणि अन्य कितीतरी अल्पसंख्याक भारतीयांच्या नेतृत्वाखाली भारताने मोठी प्रगती केली आहे. आता तुम्ही सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये बळजबरीने अल्पसंख्य बनवलेल्या धर्माच्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचे प्रयत्न सुरू करावेत, असा सल्ला विश्वास यांनी मेहबुबांना दिला आहे.