खासदार डॉ. कोल्हे यांची तत्परता : परराष्ट्रमंत्र्यांकडून दखल
नारायणगाव- खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पोलंड येथे उच्च शिक्षणासाठी गेलेल्या ओंकार यशवंत विनोदे या विद्यार्थ्यांला भारताचे तेथील राजदूत त्सेवांग नामग्याल यांनी तत्काळ वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे.
ओंकार यशवंत विनोदे हा भारतीय विद्यार्थी पोलंडमधील एका विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेला आहे. वॉर्सा येथे वास्तव्यास असणाऱ्या ओंकारला दोन दिवसांपासून चेस्ट पेन व बॅक पेनचा त्रास जाणवत होता. त्यामुळे ओंकारने (दि.16) सकाळी खासदार डॉ. कोल्हे यांना मेसेज करून आपली प्रकृती खालावली असून योग्य वैद्यकीय उपचार व्हावे, यासाठी मदत करण्याची विनंती केली.
गांभीर्य ओळखून डॉ. कोल्हे तातडीने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून पोलंड येथील भारतीय दूतावासातील राजदूतांना ओंकारला मदत करण्यासाठी सूचना देण्याची मागणी केली. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी तात्काळ दखल घेऊन पोलंड आणि लिथुआनिया येथील भारताचे राजदूत त्सेवांग नामग्याल यांना मेल फॉरवर्ड करुन मदत करण्याची सूचना दिली.
अवघ्या काही तासांत भारताचे राजदूत नामग्याल यांनी ओंकार विनोदे याच्याशी संपर्क साधून कॉन्फरन्स कॉलद्वारे जनरल फिजिशियनसमवेत त्याला होणाऱ्या त्रासाची माहिती घेतली. त्यानंतर जनरल फिजिशियनने ओंकारला औषधांचे प्रिस्क्रीप्शन दिले. आराम करण्याचा सल्ला दिला. सोमवारी पुन्हा प्रकृतीबाबत माहिती देण्याची सूचना केली आहे. काही तासांतच ओंकारला वैद्यकीय मदत मिळाली आहे. त्यानंतर स्वत: नामग्याल यांनी ही माहिती डॉ. कोल्हे यांना ई-मेल द्वारे कळवली.