ऑकलंड – न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रॅंडन मॅक्कलम याने सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मॅक्कलम हा सध्या कॅनडात सुरू असलेल्या कॅनडा चषक टी-20 लीगमध्ये टोरांटो आंतरराष्ट्रीय संघाकडून खेळत आहे. ही लीग आपली अखेरची स्पर्धा असल्याचे त्याने म्हटले आहे.
मॅक्कलमने 2016 मध्येच आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटला रामराम केला होता. मात्र, तो विविध देशांमधील टी-20 लीगमध्ये भाग घेत होता. त्याने 101 कसोटीमध्ये प्रतिनिधित्व करताना 6 हजार 453 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 12 शतके टोलविली आहेत. एकदिवसीय 260 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 6 हजार 83 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 5 शतके टोलविली. टी-20च्या 71 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 2 हजार 140 धावा केल्या. त्याने आयपीएलच्या पहिल्या मोसमात रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध 73 चेंडूंमध्ये नाबाद 158 धावा करीत कोलकाता नाईटरायडर्सला विजय मिळवून दिला होता.
मॅक्कलमने सांगितले की, अतिशय समाधानाने मी स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. कॅनडातील स्पर्धेनंतर होणाऱ्या युरो टी-20 लीगमध्ये मी सहभागी होण्याचे जाहीर केले होते. पूर्वीसारखी तंदुरुस्ती माझ्याकडे राहिलेली नाही. माझ्याऐवजी अन्य युवा खेळाडूला संधी देण्यासाठी मी या लीगमधून माघार घेत आहे. टी-20 च्या व्यावसायिक लीगमध्ये मला सहभागी करून घेणाऱ्या सर्व संघटकांचा मी ऋणी आहे.