मुंबई – रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज (Road Safety World Series 2022) मालिकेला लवकरच प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील इंडिया लिजंड्स संघाचे नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) करणार आहे. गेल्या काही काळापासून सचिन या स्पर्धेत खेळतही आहे व आयोजनातही सहभाग घेत आहे. गेल्या मोसमात झालेल्या या स्पर्धेचे याच संघाने विजेतेपद मिळवले होते.
ही स्पर्धा येत्या 10 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना कानपूरमध्ये तर, दोन उपांत्य लढती रायपूरमध्ये खेळवल्या जाणार आहेत. अंतिम लढतही येथेच होइल.
या स्पर्धेतील अन्य साखळी सामने इंदुर व डेहराडून येथे खेळवण्यात येणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत न्यूझीलंड लिजंड्स संघही सहभागी होणार आहे. भारतात आणि जगभरात रस्ते सुरक्षा जनजागृती निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.
या स्पर्धेत भारत व न्यूझीलंड यांच्यासह ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंड हे संघही सहभागी होणार आहेत. या स्पर्धेला भारत सरकारचे वाहतूक, माहिती तसेच प्रसारण, युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे.