पाचगणी – मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देऊन जावळी तालुक्यातील केडंबे गावचे सुपुत्र तुकाराम ओंबळे यांनी आपले नाव इतिहासात अजरामर केले. हुतात्मा ओंबळे यांच्या भव्य स्मारकाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे असून स्मारकाचे काम मार्गी लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बोंडारवाडी धरणाचा प्रश्न देखील मार्गी लावला जाईल. तसेच हुतात्मा ओंबळे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम दिमाखात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या 14 व्या स्मृतिदिनिमित्त आज केडंबे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, माजी शिक्षण समिती सभापती अमित कदम, जिल्हा परिषद माजी सदस्य अर्चना रांजणे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, बांधकाम उपअभियंता सारंग इनामदार, वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता सचिन बनकर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप पवार, एस. एस. पार्टे, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक गिरी, सयाजीराव शिंदे, राजाराम ओंबळे, आनंदराव सपकाळ, शांताराम आंग्रे, मोहनराव कासुर्डे, बबनराव बेलोशे, डी. एच. वायदंडे, आझाद महाराज गुजर, उपसरपंच महादेव ओंबळे,बाळासाहेब ओंबळे आदींची उपस्थिती होती.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “”हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अंदाजपत्रक तयार आहे. विभागातील 54 गावांसाठी बोंडारवाडी धरण होणे गरजेचे आहे. या धरणाच्या कामास गती देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करणार आहे. आंबेघर ते बोंडारवाडी रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुनवडी पुलाचे दर्जेदार काम करणार आहे.”
यावेळी राजनंदिनी घोरपडे, श्रेया ओंबळे, सेजल ओंबळे या विद्यार्थिनीची भाषणे झाली. सारंग इनामदार, अमित कदम, एस. एस. पार्टे, पुरुषोत्तम जाधव, सदाशिव सपकाळ आदींनी हुतात्मा ओंबळे स्मारकाचे काम लवकर करण्याची मागणी केली. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मेढा ते केडंबे अशी सायकल रॅली काढून अभिवादन केले. प्रारंभी हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीचे प्रकाशन आमदार भोसले व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांच्यावतीने निराधार महिलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी माजी सैनिक अर्जुन देशमुख, हरिभाऊ वेंदे यांचाही सत्कार करण्यात आला. एकनाथ ओंबळे यांनी प्रास्ताविक केले. शंकर जांभळे यांनी सूत्रसंचालन केले.