सातारा – हातकणंगले तालुक्यातील कला क्रीडा सांस्कृतिक केंद्राने सातारा शहरासह जिल्ह्यात चांगले बस्तान बसवले आहे. कला क्रीडा केंद्राच्या नावाखाली या केंद्रात अवैध धंदे सुरू असल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे. भल्याभल्यांना कायद्याने वठणीवर आणणारे जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या केंद्राकडे कायदेशीर लक्ष घालून त्याची पाळेमुळे खणून काढावी, अशी मागणी होत आहे.
हातकणंगले कला क्रीडा सांस्कृतिक केंद्राला सातारा जिल्ह्यामध्ये हातपाय पसरायला चांगलाच वाव मिळाला आहे. या केंद्रामध्ये कोणाचा वावर आहे, कोणाची उठबस आहे, या केंद्रात काय काय चालते याबाबत ना पोलिसांचे लक्ष आहे ना जिल्हा प्रशासनाचे. शासकीय नियम धाब्यावर बसून या केंद्रात अवैध धंद्याने जोर पकडल्याची चर्चा जिल्ह्यात होत असून कोल्हापूरच्या या कला केंद्राने साताऱ्यात कोणाचे बोट पकडून आपले हातपाय पसरले याचीसुद्धा दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात अनेक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांमधून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात. यासाठी कला केंद्रांना धर्मादाय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी काढावी लागते. तसेच यासंदर्भात असलेले नियमसुद्धा तितक्याच कटाक्षाने पाळावे लागतात. मात्र, जिल्ह्यातील या सांस्कृतिक, कला, क्रीडा केंद्रांवर तपासणी होत असताना ती पारदर्शी पद्धतीने होत नसल्याची तक्रार आहे. या केंद्रांवर कारवाई करताना पोलीस मुग गिळून का गप्प बसले आहेत, याचे उत्तर जिल्हावासियांना मिळालेले नाही.
पोलीस प्रशासन कारवाई करणार का?
सातारा शहरातील राधिका रोड, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, मंगळवार पेठ, चिपळूणकर बाग, वाठार स्टेशन, खटाव तालुक्यातील पुसेगावपासून पाच किलोमीटरवर या केंद्राच्या विविध शाखा आहेत. या सहा ठिकाणी अद्याप एकही अवैध प्रकार सुरू असल्याची तक्रार झालेली नाही. सांस्कृतिक, कला केंद्र सुरू करतेवेळी परवानग्या कशा दिल्या गेल्या हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. या केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा जुगार होणार नाही असे प्रतिज्ञापत्र चालकाकडून सादर केले जाते. बेकायदेशीर सुरू असलेल्या अशा सांस्कृतिक केंद्रावर कारवाई पोलीस प्रशासन करणार का हा खरा कळीचा मुद्दा आहे.