रेल्वे गाडीला नाव देण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनास निवेदन
जेजुरी- तीर्थक्षेत्र कोल्हापूरच्या “महालक्ष्मी एक्स्प्रेस’प्रमाणे या मार्गावरून धावणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीस “मार्तंड एक्स्प्रेस’ नाव देण्यात यावे तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना जेजुरीत थांबा मिळावा, अशा मागण्यांचे निवेदन ज्येष्ठ नागरिक संघटनेने ग्रामस्थांच्यावतीने मध्य रेल्वे प्रशासनाच्या विभागीय मंडल प्रमुख रेणू शर्मा आणि उपविभागाच्या नीलम चंद्रा यांना देण्यात आले.
जेजुरी रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे अधिवेशनादरम्यान रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वानी लोहाणी यांची भेट घेऊन केली होती. यानुसार विभागीय मंडल प्रमुख शर्मा आणि उपविभागाच्या चंद्रा यांनी जेजुरी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी रेल्वे स्थानकाच्या प्रथम दर्शनीय भागास बनवण्यात आलेल्या जेजुरीगड प्रतिकृतीची पाहणी करून त्यांनी प्रसिद्ध शिल्पकार दिनकर थोपटे यांच्या कामाचे कौतूक केले.
जेजुरीला दररोज हजारो भाविक येत असतात, त्यांची गैरसोय होऊ नये. भाविकांना पुरेशी जागा उपलब्ध व्हावी. पाणी, स्वच्छतागृह आदी पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेत जेजुरी रेल्वे स्थानक विकासाच्या कामात खासदार सुळे यांनी विशेष पुढाकार घेऊन कामांना गती दिली आहे. त्यानुसार मध्य रेल्वे प्रशासनाच्या विभागाकडून करण्यात आलेल्या पाहणीला महत्त्व दिले जात असून पाहणीनंतर शर्मा तसेच चंद्रा यांनी रेल्वे स्थानकाच्या संबधित बदलाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. स्थानिक लोकांच्या मागण्या आणि भाविकांच्या सुविधा या कामांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, असेही यावेळी शर्मा यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, गणेश आबनावे, शिवसेना शहरप्रमुख विठ्ठल सोनावणे, भाजपच्या अलका शिंदे, विजय खोमणे, रामभाऊ झगडे, श्याम माने, बाळू खाडे, ज्येष्ठ नागरिक गोविंद दीडभाई, शिल्पकार दिनकर थोपटे आदी यावेळी उपस्थित होते.