पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अमेरिकेत जहाजावर ‘मरिन इंजिनिअर’ म्हणून निवड झालेला पुण्यातील तरुण अमेरिकेहून सिंगापूरच्या दिशेने निघालेल्या जहाजावरून बेपत्ता झाल्याची घटना तक्रार अर्जामुळे समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी वारजे पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र विभागाशी संपर्क साधून माझ्या मुलाचा शोध घ्यावा, अशी विनंती तरुणाच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.
प्रणव गोपाळ कराड (२२, रा. गणपती माथा मंदिराजवळ, वारजे) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. प्रणवचे वडील खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. ते मूळचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रहिवासी आहेत. प्रणवची मुंबईच्या अंधेरीतील एका शिप मॅनेजमेंट इंडिया प्रा. लि. कंपनीमध्ये निवड झाली होती.
त्यानंतर तो कंपनीमार्फत सहा महिन्यांपासून अमेरिकेतील जहाजावर मरिन इंजिनिअर म्हणून नोकरीस होता. अमेरिकेहून सिंगापूरच्या दिशेने जहाज निघाले होते. या जहाजावरून प्रणव पाच एप्रिलला बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीकडून वडिलांना इ-मेलद्वारे कळविण्यात आली.
मात्र, त्यानंतर कंपनीकडून समाधानकारक माहिती दिली जात नसल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. त्याच्यासमवेत असलेल्या मित्र आणि सहकार्यांचा मोबाइल क्रमांक देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे काहीतरी गैरप्रकार घडल्याचा संशय येत आहे, असे प्रणवचे वडील गोपाळ कराड यांनी वारजे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
अमेरिकेत मरिन इंजिनिअर म्हणून नोकरीस असलेल्या प्रणव बाबतब क्रूजवरून त्याच्या वडिलांना मुलगा बेपत्ता झाल्याचा इ-मेल आला होता. त्यानंतर त्यांनी आमच्या पोलीस ठण्याशी संपर्क साधून यामध्ये लक्ष घालण्यासाठी तक्रार अर्ज दिला आहे. आम्ही मुलाच्या वडिलांना अंधेरी येथील कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.- मनोज शेडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वारजे पोलिस ठाणे