राजगुरूनगर – आतापर्यंत सर्वांनी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये चौकार, षटकार झाला की “चिअर गर्ल्स’ थिरकत असल्याचे पहिले होते, अगदी त्याच धर्तीवर पांगरी (ता. खेड) बैलगाडा घाटात बारीचे सेकंद पुकारून झाल्याबरोबर या मराठमोळ्या वेश परिधान केलेल्या “चिअर गर्ल्स’ मराठी गाण्यांवर नाचून प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणीत करीत होत्या.
पांगरी येथे शनिवारी (दि. 2) श्री रोकडोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. ग्रामस्थांनी त्यासाठी लोकवर्गणी जमा करून मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील आयोजित केले होते; मात्र या सर्वांचे प्रमुख आकर्षण ठरले ते बैलगाडा घाटातील “चिअर गर्ल्स’ची उपस्थिती. नऊवारी साडी नेसून, नाकात नथ घालून स्वतंत्र व्यासपीठावरून “चिअर गर्ल्स’नी पहिल्या क्रमांकात येणाऱ्या बैलगाड्याला चिअर केले. भर उन्हात घाटात उभे राहून वाऱ्याच्या वेगाने धावणारा बैलगाडा पाहून आनंद व्यक्त करणाऱ्या प्रेक्षकांना “चिअर गर्ल्स’नी सुद्धा तेवढाच आनंद मिळवून दिला.
बैलगाडा शर्यतीवरील न्यायालयीन बंदीनंतर काही वर्षांनी सुरू झालेल्या बैलगाडा शर्यतीना ग्रामीण भागात अनेक अर्थानी महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धक बैलगाडा मालकांबरोबर आयोजकांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पांगरी येथे आयोजकांनी शर्यतीचा उत्साह वाढवा या हेतूने बैलगाडा घाटात “चिअर गर्ल्स’ आणून शर्यतीत रंगत आणली. या अनोख्या पण रंगतदार प्रकाराची चर्चा बैलगाडा शौकिनांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आणि त्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. यामुळे बैलगाडा शर्यतीला आता मोठी प्रसिद्धी मिळत आहे व बैलगाड्याचे महत्त्व वाढणार आहे.