Maratha reservation – आरक्षणाच्या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या मराठा, जाट, पाटीदार यासह देशभरातील अन्य प्रमुख समाजांतर्फे दिल्लीत रान पेटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
ओबीसींची आरक्षण मर्यादा वाढवा आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा महासंघ आणि जाट महासभा एकजूट झाले आहेत.
दरम्यान, दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये अखिल भारतीय जाट महासभेचे संमेलन झाले. यावेळी आरक्षणासाठी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
यासाठी जाट महासंघ आणि मराठा महासंघाची लवकरच समन्वय समीती नेमण्यात येणार असून मराठा, जाट यांच्यासह आरक्षणापासून वंचित राहिलेल्या पाटीदार यासह अन्य समाजाच्या प्रतिनिधींचा तसेच कायदेतज्ज्ञांचा समितीत समावेश असणार आहे.
घटनादुरुस्ती करून ओबीसी मर्यादा वाढवा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, त्याखेरीज आरक्षण टिकणारे नाही अशी दोन्ही गटांची भूमिका आहे. मात्र, जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेल्या कालवधीच्या आधीच हिवाळी अधिवेशन संपत आहे.
यामुळे मराठा महासंघाच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरला सुरू होणार आहे. हे अधिवेशन 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. यामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन महत्त्वाचे असणार आहे.