मुंबई – अभिनेता अजय देवगण, संजय दत्त आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या आगामी “भुज : द प्राइड ऑफ इंडिया” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर इतका जबरदस्त आहे की, त्याचे कौतुक करताना तुम्ही देखील थकणार नाहीत.
ट्रेलरची सुरुवात 1971मधील गुजरातच्या भुजमधून होते. यानंतर, भारतीय तिरंगा आकाशात फडकतान दिसला आहे. यानंतर असे कळते की, पाकिस्तानी हवाई दलाने भुज एअर बेसवर हल्ला केला आहे.
आणि याच हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारत देश तयार आहे. त्यानंतर एअर फोर्स स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिकची भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणची एंट्री होताना दिसते. ट्रेलरमध्ये अजयचे दमदार डायलॉग आणि ऍक्शन सिन सुद्धा दिसून येत आहेत.
दरम्यान, “भुज : द प्राइड ऑफ इंडिया” हा चित्रपट 1971 साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून यात अजय देवगण स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट हवाई दलाच्या युद्धातील योगदानावर असून कर्णिक हे भारत-पाक युद्धादरम्यान हवाई दलाच्या भूज तळावर नियुक्त होते.
भारत-पाकच्या या युद्धात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात भूज तळावरील धावपट्टी उद्ध्वस्त झाली. यावेळी कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेत आजूबाजूच्या गावातील महिलांची तळ बांधणीसाठी मदत घेतली. यानंतर कर्णिक यांनी सुंदरबेनसहित 300 महिलांच्या मदतीने पुन्हा एअरबेस उभारले.
चित्रपटात अजय व्यतिरिक्त संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही आणि अॅमी विर्क यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. “भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ येत्या 13 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.