chagan bhujbal : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. यामुळे सध्या मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात वाद सुरू झाले आहेत. याप्रकरणी मराठा समाजाने छगन भुजबळ यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. आज छगन भुजबळ येवल्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. परंतु त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
भुजबळ आज येवला -लासलगाव मतदारसंघ भागातील गारपीट आणि अवकाळी नुकसानीचा पाहणी करणार आहेत. मात्र येथील मराठा समाजाने शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करुन द्या, पण आमच्या बांधावर येण्याचा अट्टाहास का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर सोमठानदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणा देखील देण्यात आल्या. यातच आता भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारी एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिप?
ग्रामस्थ : भुजबळ साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो येऊ नका, आमच्या गावच्या बांधावर येऊ नका….
छगन भुजबळ: बघू काय करायचे ते?
ग्रामस्थ : तुम्ही आले तर वातावरण खराब होईल. सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे गावाच्या बांधावर येऊ नये
छगन भुजबळ: बरं….
ग्रामस्थ : जमीनीचा ७/१२ आमच्या बापाचा आहे.
छगन भुजबळ: मला कोणी म्हटलं या तर मी जाईल, नाही म्हटलं तर बघू…
ग्रामस्थ : तुम्हाला कोणी या म्हणत नाही… आमच्या गावचा ठराव झाला आहे. त्यामुळे तुम्ही येऊ नका..
छगन भुजबळ: तुम्ही चार लोक म्हणजे ठराव होतो का?
मला गावबंदी कोणी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही – भुजबळ
दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बुधवारी रात्री येवल्यात दाखल झाले. गुरुवारी सकाळी ते शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मला गावबंदी कोणी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही असं भुजबळ म्हणाले. मराठ्यांना जर ओबीसीमध्ये बळजबरीनं टाकलं तर त्यांना काहीच मिळणार नाही, मराठा समाजातील समजूतदार लोकांना हे लक्षात येतं. तसेच विरोध करणारे किती आणि या म्हणारे किती… हेही बघायला हवं, असं छगन भुजबळ म्हणाले. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त येवला भुजबळ संपर्क कार्यालयावर व दौऱ्यादरम्यान तैनात करण्यात आला आहे.