पुणे (संजय कडू ) -“रमी खेळा, पैसे जिंका’ किंवा “ऑनलाइन रमी खेळून जिंका 5 ते 50 हजारांचा वेलकम बोनस’ अशा प्रकारच्या जाहिरातींचा भडिमार मागील काही दिवसांपासून होत आहेत. हा इतका बोनस न मागता कसा काय आपल्या खात्यात जमा होतो? असा विचार अनेकांच्या मनात येत असतो. तर ही बोनसची रक्कम लोन ऍप कंपन्या त्यांचा काळा पैसा “रमी’ ऍपमध्ये वळवत आहेत. तर, मुख्य विषय हा बोनस आपल्याला प्रत्यक्षात मिळतो का? तर त्याचे उत्तरही “नाहीच’ असेच आहे. बोनसची रक्कम जमा झाल्याच्या आनंदात अनेकजण “रमी’ खेळाकडे वळतात. मात्र, खेळताना ते बोनसची रक्कमही गमवून बसतात. लाखात एखाद्यालाच ही रक्कम मिळालेली असते, असे निरीक्षण सायबर पोलिसांनी नोंदवले आहे.
मोबाइलवर ऍप्लिकेशनद्वारे हा गेम खेळला जातो. तरुणांना या “रमी’चेही वेड लागले आहे. मात्र, “रमी’ खेळताना मोठी आर्थिक जोखीम असते. या जुगाराच्या जाहिराती सर्रासपणे टीव्ही आणि सोशल माध्यमांवर दिसत आहेत. यातून अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत आहेत. तर, काहींनी कर्जबाजारीपणातून आत्महत्याही केल्या आहेत. राजगुरुनगरमध्ये ऑगस्ट 2022 मध्ये शेखर नावाच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याला ऑनलाइन “रमी’चे व्यसन होते. यातून तो कर्जबाजारी होऊन नैराश्यात गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पैसे मिळण्याच्या आशेने तासन्तास मोबाइलवर हा खेळ खेळला जात असल्याने अनेकांना मानेचा आणि पाठीचा त्रास जाणवू लागला आहे. तसेच डोळ्यांच्या त्रासासबरोबरच बोटांच्या संवेदनाही बोथट होत आहेत.
कलाकारांवरच कारवाई करा : राष्ट्रवादी कॉंग्रेस
राज्यात मटका किंवा पत्त्याच्या सहाय्याने “रमी’जुगार खेळण्यास बंदी आहे. अशा प्रकारे खेळ घेणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असतात. मात्र, ऑनलाइन “रमी’ जुगारावर कारवाईची तरतूद नाही. ऑनलाइन “रमी’च्या माध्यमातून राज्यात सर्रास ऑनलाइन जुगार खेळला जात आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी “रमी’ कंपन्या अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपट कलाकारांना घेऊन जाहिराती करत आहेत. या प्रकारे प्रोत्साहन देणाऱ्या कलाकारांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
“रमी’ ऍपमधून फसवणूक झाल्याची एकही तक्रार अद्याप सायबर पोलीस ठाण्याकडे आलेली नाही. मात्र, अनेक तरुण”रमी’ ऍपच्या आहारी गेलेले दिसत आहेत.
-मिनल पाटील, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन