मंचर -मंचरमधून करोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय आणि स्थानिक मजूर गावी निघाले आहेत; पण हे गाव सोडताना मंचरकरांनी केलेले सहकार्य पाहून हे मजूर गहिवरले आहेत. मंचरकरांनी माणुसकीचा धर्म जोपासत या गोरगरीब थकलेल्या मजुरांना मदतीचा हात पुढे केला आहे, मंचर सोडताना हा माणुसकीचा गहिवर आम्हाला पुढचा प्रवास करण्याचे बळ देणारा आहे, अशी भावना या मजुरांनी व्यक्त केली आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सुरू असलेला लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेल्या परप्रांतीय मजुरांनी आपापल्या गावी जाण्यासाठी पायी, सायकल, मोटरसायकलवरून प्रवास सुरू केला आहे. या मजुरांचा हा प्रवास काहीसा जीवघेणाही ठरत आहे. असंख्य मजूरबांधव हे पुणे-नाशिक महामार्गाने नाशिकच्या दिशेने जाताना दिसत आहेत.
पुणे-नाशिक रस्त्यावरून सायकलद्वारे जाणाऱ्या परप्रांतीय आणि स्थानिक मजुरांच्या सुरक्षिततेसाठी मंचर येथे रिफ्लेक्टिव्ह जॅकेट व टॉर्च देण्यात आले आहेत, यामुळे मागून किंवा पुढून येणाऱ्या वाहनांनाही सायकल चालक सहज नजरेस पडत आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरील विविध गावांतील कार्यकर्त्यांनी सायकलवर जाणाऱ्या अशा मजुरांना रिफ्लेक्टिव जाकीट व टॉर्च द्यावेत, या वस्तूंना साधारणपणे 70 रुपये खर्च येत आहेत, असे आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले आहे