पुणे – मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. मावळ तालुक्यात आंबी एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत ते आढळले. फ्लॅट मधून दुर्गंधी येत असल्याने लोकांनी पोलिसांना कळवले. फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ते मृतावस्थेत आढळले. दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. भाड्याने फ्लॅट घेऊन ते एकटेच तेथे राहात होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
शरद पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, “आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झालेली आहे. महाजनी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”
आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची… pic.twitter.com/MXr7aNagbs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 15, 2023
रवींद्र महाजनींचा जीवनप्रवास –
रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. त्यांचे वडील ह. रा महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. त्यांच्या निधनानंतर रवींद्र महाजनी यांच्यावर घराची जबाबदारी आली. पण त्यांनी टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मात्र संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो अशी त्यांच्यावर टीका झाली. यामुळे नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते.
मुंबईत टॅक्सी चालवून रवींद्र महाजनी अभिनय क्षेत्रात आले होते. मधुसुदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. या नाटकातील त्यांचा अभिनय पाहून शांताराम बापूंंनी त्यांना चित्रपटात संधी दिली. व्ही शांताराम यांच्या झुंज चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रवींद्र महाजनींनी 1975 ते 1990 चा काळ गाजवला होता. देखण, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, लक्ष्मी, रुबाबदार, काय राव तुम्ही यासारखे त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.