नवी दिल्ली – शेवटची तारीख उलटून गेली तरी अद्याप मोठ्या संख्येने पॅन कार्ड आधार कार्डशी जोडलेले नाहीत. 29 जानेवारी 2024 पर्यंत 11.48 कोटी पॅन असे आहेत जे आधारशी लिंक नाहीत, अशी माहिती वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात लोकसभेत दिली.
दंड रुपात मिळाले 601.97 कोटी रुपये –
अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, आधारशी पॅन लिंक करण्यास विलंब करणाऱ्यांकडून आतापर्यंत सरकारला 601.97 कोटी रुपये दंड म्हणून मिळाले आहेत. पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 होती. 1 जुलै 2023 पासून, आधारशी पॅन लिंक करणाऱ्यांकडून 1,000 रुपये दंड आकारला जात आहे.
पॅन आधारशी लिंक नसल्यास हे फायदे मिळणार नाहीत –
सर्व प्रकारच्या वित्तीय सेवा सुरू ठेवण्यासाठी सरकारने पॅनला आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. प्राप्तिकर विभागाने सांगितले होते की, जे करदात्यांनी 30 जून 2023 पर्यंत आपला पॅन आधारशी लिंक केलेला नाही, त्यांचा पॅन 1 जुलै 2023 पासून निष्क्रिय होईल.
अशा पॅनधारकांना आयकर परतावा दिला जाणार नाही. तसेच, अशा करदात्यांकडून TDS आणि TCS जास्त दराने कापले जातील. 1,000 रुपये विलंब शुल्क भरून पॅन पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.
जीएसटी चोरीची 14,597 प्रकरणे –
दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात पंकज चौधरी म्हणाले की, एप्रिल-डिसेंबर 2023 या कालावधीत केंद्रीय अधिकाऱ्यांनी जीएसटी चोरीची 14,597 प्रकरणे शोधली आहेत. त्यापैकी सर्वाधिक 2,716 प्रकरणे महाराष्ट्रात आढळून आली आहेत. गुजरात 2,589 प्रकरणांसह दुसऱ्या, हरियाणा 1,123 प्रकरणांसह तिसऱ्या आणि बंगाल 1,098 प्रकरणांसह चौथ्या स्थानावर आहे.