मुंबई – नवीन वर्षात राज्यातील दोन मोठी प्रशासकीय पदे रिक्त होणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव आणि राज्य पोलीस महासंचालक या दोन पदांचा त्यामध्ये समावेश आहे. यातील मुख्य सचिव पदावरून रस्सीखेच सुरु असल्यासारखी स्थिती आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन नावे घेतली जात आहे. विद्यमान मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या पत्नी सुजाता सौनिक आणि नितीन करीर. मात्र मनोज सौनिक यांनाच जर मुदतवाढ दिली तर या दोघांचाही पत्ता कट होणार आहे.
मुख्य सचिव मनोज सौनिक हे 31 डिसेंबरला निवृत्त होणार आहेत. दुसरीकडे मनोज यांना मुदतवाढ देण्याच्या हालचालीही सुरु आहेत. 3 ते 6 महिने मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्तावही राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला आहे. जर मुदतवाढ दिली नाही तर त्यांच्या जागी पत्नी सुजाता सौनिक यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. मात्र याचा एक लाॅबी विरोध करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मनोज सौनिक यांना मुदतवाढ देणं योग्य नाही त्यामुळे दुसऱ्या अधिकाऱ्यांवर अन्याय होईल या हेतून काही कॅबिनेट सदस्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तसे मतही व्यक्त केले आहे.
जर मनोज यांना मुदतवाढ न देता त्यांच्याजागी दुसऱ्या अधिकाऱ्यांना संधी द्यायची वेळ आल्यास सुजाता सौनिक आणि आयएएस नितीन करीर मुख्य सचिव होण्याची शक्यता आहे. सुजाता सौनिक या 30 जून 2024 रोजी निवृत्त होणार आहेत तर नितीन करीर हे 31 मार्च 2024 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. यामुळे याजागेवर नितीन करीर यांना संधी द्यावी. ते निवृत्त झाल्यावर सुजाता यांनाही संधी मिळेल कारण करीर हे सुजाता सौनिक यांच्या आधी निवृत्त होणार आहेत. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. नितीन करीर हे 1998 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या प्रशासकीय कालावधिबाबत थोडक्यात माहिती –
मनोज सैनिक हे महाराष्ट्र केडरचे 1987 बॅचचे आहेत, मूळचे बिहारचे आहेत. 1989 ते 1990 मध्ये त्यांनी त्रिपुरामधये उप विभागीय अधिकारी म्हणून काम पाहिलं. 1990 मध्ये जालनाचे सहाय्यक जिल्हाधिकारी. 1992 ते 1993 या एक वर्षाचा कालावधीत युकेमध्ये फॉरेन असाइन्मेंट साठी रवाना. 1993 ते 1995 जिल्हा परिषद रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
1995 ते 96 पुण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. 1996 ते 1998 नाशिक जिल्हाधिकारी. मार्च 1998 ते ऑक्टोबर 1998 धुळे जिल्हाधिकारी. फेब्रुवारी 2006 ते जुलै 2009 सुशील कुमार शिंदे यांचे खासगी सचिव. जानेवारी 2010 ते नोव्हेंबर 2012 जॉईंट सेक्रेटरी डिफेन्स प्रोडक्शन नवी दिल्ली. डिसेंबर 2016 ते जून 2018 प्रधान सचिव ट्रान्सपोर्ट आणि पोर्टस.
नोव्हेंबर 2017 ते एप्रिल 2018 आयुक्त ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट. ऑगस्ट 2019 ते मे 2020 अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग. मे 2020 ते जून 2023 अतिरिक्त मुख्य सचिव पब्लिक वर्क डिपार्टमेंट. 30 एप्रिल 2023 मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य. एक मे 2023 ते 2 मे 2023 वित्त विभाग अतिरिक्त भार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या सौनिक यांनी मंत्रालयात वस्त्रोद्योग, परिवहन विभागाचे प्रधान सचिव तर सार्वजनिक बांधकाम, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.