पुणे – राज्यातील बहुतांश भागात मॉन्सून सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्यात शहर परिसरात तुरळक स्वरूपाचा, तर घाटमाथा परिसरात चांगला पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात शिवाजीनगर येथे 5.8 मिमी तर लोहगाव येथे 4.6 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. विभागाच्या नोंदीनुसार महाबळेश्वर येथे सर्वाधिक म्हणहे 48 मिमी तर कोल्हापूर येथे सर्वात कमी म्हणजे एक मिमीपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मध्यमहाराष्ट्रातील घाटमाथा, कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर मराठवाड्यात तुरळक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशाच्या उत्तर भाग व दक्षिण उत्तर प्रदेशावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पूर्व उत्तर भागाकडे सरकणार असून, पुढील दोन दिवसानंतर या पट्ट्याची तीव्रता कमी होणार आहे. यामुळे विदर्भातील पावसाचा जोर कमी होणार आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस पडेल. तसेच उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.