भिगवण- मदनवाडी (ता. इंदापूर) येथे रोटरी क्लबच्या माध्यमातून ओढा खोलीकरणाचे काम करण्यात आले होते. या कामामुळे मदनवाडीतील भूगर्भातील पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे मदनवाडी पाणी टंचाई मुक्त झाल्याने शेतकरी वर्गात समाधनाचे वातावरण पसरले आहे.
मदनवाडी हे उजनी धरणा लगतचे गाव आहे. पण नदीकिनारा उथळ असल्याने धरणपातळीपासून पाणी सुमारे चार किलोमीटर पेक्षा अधिक दूर जाते. गावच्या उत्तरेस नदीकिनारी असलेली पिके सुद्धा उन्हाळ्यात पाण्याच्या आभावी जळून जातात. परंतु रोटरीच्या माध्यमातून पाणीपातळी वाढली आहे.रोटरी क्लबच्या माध्यमातून मदनवाडी तलाव ते पुणे-सोलापूर महामार्ग या दरम्यान साडेचार किलोमीटर ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले होते. या कामासाठी रोटरी क्लब ऑफ भिगवणसह रोटरी क्लब ऑफ पुणे, शनिवारवाडा व इतर तीस क्लबनी मिळून निधीच्या माध्यमातून ओढा खोलीकरणाचे काम केले होते. त्यशामुळे या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होत आहे.
मदनवाडी गावात उन्हाळ्यामध्ये प्रचंड पाणीटंचाई जाणवत असे, उभी पिके पाण्याअभावी जळून जात असे या गावांमध्ये आता पिण्याची पाण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई पूर्णपणे दूर झाली आहे. या कामासाठी रोटरी क्लब ने पुढाकार घेतला व ग्रामस्थांनी भरभरून साथ दिली त्यामुळे चौदा कोटी लिटर पाणी या ओढ्यामध्ये साठू शकते, त्यामुळे आजुबाजुच्या विहीरी व बोअरवेलला पाणी वाढले आहे. या कामाचे लोकार्पण मीना बोराटे, मीरा भरवीरकर यांच्या हस्ते पाण्याचे पुजन करून पार पडले.
यावेळी भिगवण रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप वाकसे, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, माजी अध्यक्ष महेश शेंडगे, रियाज शेख, कमलेश गांधी, संपत बंडगर, सरपंच आम्रपाली बंडगर, सुदर्शना थोरात, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रकाश ढवळे, रंगनाथ देवकाते, विष्णूपंत देवकाते, राजाभाऊ देवकाते आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन औदुंबर हुलगे, संजय खाडे, अकबर तांबोळी, रणजीत भोंगळे, कुलदीप ननवरे, धरणेंद्र गांधी यांनी केले होते.