सातारा -येथील एका संस्थेतून कमी व्याजदराने कर्ज मिळवून देतो असे सांगून सातारा शहर परिसरातील लघु उद्योजकांना लाखो रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चारूशीला शिवाजीराव मोहिते (रा. एमआयडीसी, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोमल सनी भिसे (रा. देगाव रोड, एमआयडीसी,सातारा), अनिता पाटील, स्वाती सुरजकुमार साळुंखे (पूर्ण पत्ते माहिती नाहीत) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून कोमल भिसे हिला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिला दि. 5 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदारांचा गारमेंटचा व्यवसाय असून त्यांना काही पैशांची गरज असल्याचा गैरफायदा घेत संशयितांनी त्यांना चार टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तक्रारदारांनी दि. 22 जून 2021 रोजी संशयित कोमल हिच्या गणेश प्लाझा येथील घरी संशयितांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांना ऑनलाइन बॅंकिंगच्या माध्यमातून वेळोवेळी असे एकूण दोन लाख 82 हजार रूपये दिले.