पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून लायसन्सच्या नुतनीकरणासाठी पक्क्या लायसन्ससाठी चाचणी घेण्यात येते. येत्या गुरुवारपासून या चाचण्यांचे पुनर्नियोजन करण्यात येणार आहे. तर, लायसन्स चाचण्यांचा कोटादेखील वाढवण्यात येणार आहे. यामुळे लायसन्सच्या कामाला वेग येणार आहे.
लॉकडाऊन पार्श्वभूमीवर प्रादेशिक कार्यालयाच्या परवान्यासह विविध विभागांचे काम बंद होते. मागील दोन महिन्यांपूर्वी कार्यालयाच्या परवाना विभागाचे काम सुरू झाले. मात्र, दररोजच्या अर्जदारांच्या तुलनेत कोटा अपुरा पडत असल्याने अनेकांचे लायसन्स प्रलंबित राहात होते.
प्रलंबित लायसन्सची संख्या शून्यवर येण्यासाठी कार्यालयाकडून टप्प्याटप्प्याने लायसन्सच्या कोट्यात वाढ करण्यात येते. याशिवाय वाहन चालवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे लायसन्स देण्यात येते.
यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, आयडीटीआर आणि आळंदी रस्ता येथील कार्यालयात चाचण्या घेण्यात येतात. या चाचण्यांचे गुरुवारपासून (15 ऑक्टोबर) पुनर्नियोजन करण्यात येणार असल्याचे कार्यलयाकडून सांगण्यात आले.