माणिकडोह रेस्क्यू टीम आणि वनविभागाचे तातडीचे मदतकार्य
जुन्नर: जुन्नर शहराजवळ असलेल्या हापुसबाग या गावांतील एका विहिरीत पडलेल्या अंदाजे अडीच वर्षे वयाच्या नर बिबट्याला माणिकडोह रेस्क्यू टीम व वनविभागाने केलेल्या तातडीच्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
हापुसबाग येथील सोमनाथ डोके यांच्या घरालगतच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात येताच त्यांनी ही बाब वनविभागाला कळविली. काही वेळातच दाखल झालेल्या टीमने गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला सुखरूप बाहेर काढले.
या परिसरात असलेल्या ऊसामध्ये ह्या बिबट्याचा वावर होता. भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या कठडा असलेल्या विहिरीत पडला असावा, असे गावकऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कृष्णा दिघे, वनरक्षक कांचन ढोमसे, निलेश विरणक, दशरथ डोके, वैभव वाजे तसेच माणिकडोह रेस्क्यू टीमचे धोंडिभाऊ कोकणे, योगेश चव्हाण, अनिल मोधे, केशव साबळे, वसंत भालेकर, संजय मोधे, दिनेश केदारी, शिवाजी केदारी यांच्या पथकाने बिबट्याची सुटका केली.