पुणे – पुणे पोलिसांच्या कोठडीत असलेल्या ललित पाटीलचा हर्नियाचा त्रास उफाळून आला आहे. दररोज रात्री पोटात दुखत असल्याचा बहाणा तो करत ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास भाग पाडत आहे. त्याला तपासणीला नेताना पोलीस फौजफाटा घेऊन जावा लागत आहे. एकंदर पार्श्वभूमी बघता तो नाटक करत असल्याची पोलिसांना शंका आहे. मात्र, कोणतीही रिस्क नको म्हणून ते त्याला ससूनमध्ये तपासणीसाठी नेत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ललित पाटील कारगृहात होता. ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती. मागील तीन वर्षांपासून तो येरवडा कारागृहात होता. या काळात नऊ महिने विविध उपचारांच्या नावाखाली तो ससून रुग्णालयात राहिला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तो फरार झाला होता. मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली.
यादरम्यान मुंबई पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला कोठडीत घेतले. पण, आता त्याची प्रकृती बिघडली आहे. त्याला पुन्हा जुन्या आजारांचा त्रास होत आहे. त्याच्यावर कोठडीतच उपचार केले जात आहेत.
“ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूर यांना निलंबित केले गेले आहे. ही कारवाई म्हणजे नाटक आहे. संजीव ठाकूर यांना वाचवण्याचे काम सरकार करत आहे. संजीव ठाकूर यांच्यावर मोक्का कारवाई करायला हवी. तसेच त्यांची नार्को टेस्ट करा.” – रवींद्र धंगेकर, आमदार