पुणे – राज्यातील उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदावर कार्यरत असलेल्या 283 पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खासगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील शाळांमधील सन 2003-04 ते 2010-11 मधील 935 वाढी पदांना मान्यता देण्यात आली. ततील 428 पदे व्यपगत करण्यात आली होती. 428 पदांपैकी शिक्षण उपसंचालकांनी वैयक्तिक मान्यता दिलेली 68 पदे वित्त विभागाच्या शासन निर्णयाद्वारे पुनर्जिवित करण्यात आली. सन 2003-04 ते 2018-19 मधील एकूण 1 हजार 293 शिक्षकांच्या वाढीव पदांना मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता.
वाढीव पदांना मान्यता देण्याच्या अनुषंगाने वाढीव पदावर कार्यपध्दतीने नियुक्त व कार्यभार उपलब्ध असलेल्या शिक्षकांचे त्याच किंवा अन्य संस्थेमध्ये समायोजन करण्यासंदर्भात संचालक कार्यालयाकडून पडताळणीही करण्यात आली होती. त्यात पात्र ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याच अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आलेली आहे.
जबाबदारी शिक्षण संचालकांवर
समायोजनाच्या प्रचलित धोरणानुसार वाढीव पदी कार्यरत असलेल्या शिक्षकांचे समायोजन पद उपलब्धतेनुसार प्रथम त्याच संस्थेत ते शक्य नसल्यास अन्य संस्थेत तथापि त्याच विभागात संबंधित विभागीय उपसंचालक यांनी करावे लागणार आहे. हे ही शक्य नसल्यास अन्य संस्थेत विभागाबाहेर समायोजन करण्याची कार्यवाही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी करावी लागणार आहे.