मंचर,(प्रतिनिधी) – भीमाशंकरच्या आदिवासी भागामध्ये होळी पौर्णिमेनिमित्त शिमग्याचा सण साजरा करण्यात आला. आदिवासी बांधवांमध्ये होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. कळमजाई मंदिरामागील कोकण कड्याची होळी पेटल्यानंतरच कोकणातील होळ्या व भीमाशंकर मंदिराजवळील होळी पेटविण्यात आली.
होळीचा खांब लावण्याचा मान गावच्या पाटलांना असतो. या वेळी पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी महिला होळीभोवती फेर धरून होळीची गाणी म्हणतात. हा उत्सव सलग पाच दिवस साजरा केला जातो. या दिवशी साखरेपासून तयार केलेल्या गाठीला मोठा मान असतो. तळेघरला आठवडे बाजारात शिमग्याच्यासाठी साखर गाठी खरेदीसाठी गर्दी झाली होती.
बाजारात गूळ, डाळ, खोबरे, लाल मिरची, तेलाचे डबे आदी वस्तू उपलब्ध होत्या. या बाजारात कोकणातील नागरिक कडधान्य घेऊन येतात. या बदल्यात ते लाल मिरच्या व इतर साहित्य खरेदी करतात. शिमग्यानिमित्त आदिवासी बांधव विविध नृत्ये करतात. तसेच, महिला व पुरुष पारंपरिक पोषाख घालून सोंगे लावतात.