पिंपरी – सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या वडिलांवर एका माथेफिरूने घरात घुसून चाकूने वार केल्याने ते जखमी झाले. ही घटना आज मंगळवारी (दि. २५) सकाळी सातच्या सुमारास प्राधिकरण, निगडी येथे घडली.
अजय शेगटे (वय २८) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या माथेफिरूचे नाव आहे.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली यांचे निगडी, प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक २५ येथे घर आहे. आरोपी अजय हा सकाळी अचानक सोनाली यांच्या घरात घुसला. त्यावेळी सोनाली यांचे आई वडील घरात होते. सोनाली यांच्या वडिलांनी अजयला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजयने त्यांच्यावर चाकूने वार केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेेेत.
याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यावेळी त्यांच्यातही झटापट झाली. नागरिकांनी पोलिसांना कळविताच काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अजयला ताब्यात घेतले आहे.
अजय हा सोनाली यांचा फॅन असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. निगडी पोलीस तपास करीत आहेत.