स्वयंपाकासाठी खास टिप्स

कुकरमध्ये पाण्यात मीठ घालून त्यात टोमॅटो उकळल्यास त्यांची साले पटकन निघतात. सूप, ग्रेव्ही किंवा ज्यूस करण्यासाठी साले काढलेल्या टोमॅटोंचा उपयोग होतो.

लिंबू सरबत उत्तम आरोग्यवर्धक पेय आहे. तसेच जेवणातही लिंबाचा हमखास वापर करावा. पण एकदम आणलेली लिंबे काही तासांनी कडक होतात. त्यासाठी लिंबे स्वच्छ धुवून कोरडी करावीत व त्यांना नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावीत. अशा प्रकारे ठेवलेली लिंबे अनेक दिवस ताजी व रसरशीत राहतात.

तांदूळ शिजवताना त्यात 1 चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो.

कुरकुरीत पुऱ्यांसाठी कणकेत 2 चमचे गरम तेलाचे मोहन घालावे.

भजी कुरकुरीत होण्यासाठी मिश्रणात 2 चमचे मक्‍याचे पीठ घालावे.

अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. पाण्यात थोडेसे मीठ घाला. म्हणजे अंडे पाण्यात फुटणार नाही व उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल.

बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नयेत. असे ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात.

साठवणीची मिरची पावडर शक्‍यतो काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवावी. भरण्यापूर्वी तळाशी हिंग पावडर टाकल्यास मिर्ची पावडर खराब होत नाही.

साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो.

पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो.

गरम तव्यावर थालिपीठ थापता येत नाही. म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालिपीठ तव्यावर टाकावे.

सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत.

कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते.

 – शैलजा गोडांबे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.