पुण्यातील पूर्वीची लग्नपद्धती

पुण्यातील लग्न हे पूर्वी शाही लग्न समजले जायचे. वधुवर पुण्याबाहेरचे असले, तरी त्यांना लग्न पुण्यातच करायची इच्छाच असायची. इतकी पुण्यात होणारी लग्न लोकप्रिय होती. आदल्या दिवशीचे लग्नविधीसुद्धा साग्रसंगीत पार पडायचे. जेवण साधंच, पण अतिशय चविष्ट असायचं. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून लग्नविधींना सुरुवात व्हायची रुखवताची पानं बसायची, उखळाला हळकुंड बांधून शुभविधींना सुरुवात व्हायची.

वऱ्हाडी मंडळींना नाष्टा म्हणून चिवडालाडू दिला जायचा. चहा असायचा. कॉफी मात्र मर्यादित असायची. कारण कॉफी पिणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके. लाजाहोम, सप्तपदी, कन्यादान असे सगळे विधी साग्रसंगीत व्हायचे आणि सगळे विधी पूर्ण झाल्याशिवाय जेवणाच्या पंक्ती बसायच्या नाहीत. पंक्ती तीनसाडेतीन वाजता संपवाव्याच लागायच्या. कारण संध्याकाळी रिसेप्शन म्हणजे स्वागत समारंभ असायचा.

पूर्वी लग्नाचं कॉन्ट्रॅक्‍ट दिलं जायचं नाही. त्यामुळे मनुष्यबळही बरंच लागायचं. सगळी तयारी घरीच व्हायची. त्यासाठी नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी, सगळेच जमतील तसे मदतीला यायचे. गव्हले करणं, शकुनाचे लाडू करण्यापासून देण्याघेण्याच्या साड्या वस्त्र खरेदी असा मोठा सोहळाच असायचा. पत्रिका छापून आणणं त्यावर नावं घालणं, अक्षता द्यायला जाणं, कार्य पार पडेपर्यंत मुलीचे आईवडील धास्तावलेले असायचे. मानपान नीट व्हायला हवा, कार्य नीट पार पडायला हवं याचीच काळजी मनात असायची.

आधुनिकता, पाश्‍चात्यीकरण, दूरचित्रवाणीच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरचे कार्यक्रम, मालिका यांचा परिणाम विवाहपद्धतींवरही झाला आहे. पूर्वी लग्नाच्या मुहूर्ताची वेळ कटाक्षाने पाळली जायची. पत्रिका स्वतःहून देऊन मान राखला जायचा.

आता मात्र आपापल्या घड्याळाबरोबर पळावे लागते. त्यामुळे लग्नासाठी महिनाभर वेळ काढणं मुश्‍किल. त्यामुळे पूर्ण कॉन्ट्रॅक्‍ट द्यायची पद्धत आली. पत्रिका पोस्टाने किंवा कुरियरने पाठवून फोनवर आमंत्रण दिले जाते. रिसेप्शन प्रकाराला फाटा दिला गेलाय सगळ्यांना जेवायलाच बोलावलं जातं. देणं-घेणं प्रकारात अधिक उणं व्हायला नको म्हणून आहेर देण्याघेण्याची प्रथाच बंद झाली. पंक्तीच्या ऐवजी बुफे पद्धत आली त्यामुळे अन्नाची नासाडी वाचली.

एक मात्र खरं हं की अलीडे साड्या, दागिने, वस्तू या खरेदीला खूप वेळ लागतो आणि तो सगळ्यांनाच आवश्‍यक वाटतो. शिवाय परस्पर नाते संबंध इतके आपुलकीचे आणि घट्टही राहिलेले नाहीत की हक्काने कुणाला मदतीला बोलवावे असंही काही राहिलं नाही. सगळे लग्नविधी करायलाही आजकाल वेळ नसतो त्यामुळे लग्नाची वैदिक पद्धत आली. ठराविक विधी होऊ लागले. लग्नाचा मुहूर्त उशिराचा धरून सकाळी लवकर विधी सुरू करायचे आणि आदल्या दिवशी पार पाडण्याचे लग्नविधी सकाळी लवकर करायचे. लग्न वैदिकपद्धतीने असेल तर आधीच लग्नविधी करून फक्त वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार नंतर घालायची अशीही पद्धत आली. काहीजणांना ऑफिसला जायचं असेल तर सगेच बुफेपद्धतीने जेवण दिलं जातं.

यावरून एक विचार मनात येतो की आयुष्याचे स्थितीमान आणि गतिमान असे प्रकार असतात. आजच्या तुलनेत पूर्वीचं आयुष्य संथ, स्थितीमान होतं त्यामुळे घरात कार्य असल्यावर त्याला गती यायची अगदी प्रत्यक्ष कार्यातही नातेवाईक शेजारी-पाजारी कामाला लागायचे. आता मात्र गतिमान झालेल्या आयुष्याला लग्न कार्याच्या निमित्ताने रजा घेतली जाते. पण कॉन्ट्रॅक्‍ट पद्धतीमुळे त्याला स्थितीमानता येते. लग्नाला उपस्थित राहण्यासाठी रजा काढली जाते आणि बरेच दिवसांनी नातेवाईक एकमेकांना भेटत असल्याने निवांत बसून गप्पा मारल्या जातात. त्यातल्या त्यात शुक्रवारी लग्न असेल तर सर्वांनाच आनंद होतो. कारण लग्नानंतर दोन दिवस सुट्टी त्यामुळे बाहेरगावचे मित्र, नातेवाईक यांना भेटायचे ठरते. आणि ते दिवस एन्जॉय केले जातात.

– डॉ. नीलम ताटके

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.