खंडाळी – ज्ञानगंगा बाल विकास मंडळ खंडाळी संचलित श्रीमती पार्वतीबाई ननवरे हायस्कूल व सन्मती प्राथमिक विद्यालयासह खंडाळी गाव पालखी सोहळ्यानिमित्त विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमून गेले होते.
यानिमित्त मंगळवारी (दि. ५) ननवरे हायस्कूल मधील विद्यार्थ्यांची बालदिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये २५० हून अधिक मुला – मुलींनी भाग घेतला होता. दिंडी ग्रामप्रदक्षिणा करून गावात आली त्यावेळी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष गांधी, सचिव श्रीमंत कानगुडे, स्वरूप गांधी , शितल गांधी यांनी बालदिंडीची पूजा करून उत्साहात स्वागत केले. दिंडीमध्ये असणारे विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर महाराज विणेकरी तसेच डोक्यावरती तुळस घेऊन असणाऱ्या लहान मुली, बाल वारकरी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी बाल दिंडीने गावातील कालव्याच्या जवळ विश्रांतीसाठी थांबलेल्या श्री संतराज महाराज पालखीचे दर्शन घेतले. त्याठिकाणी पालखी प्रमुख ह .भ .प .साठे महाराज व ग्रामस्थांच्या वतीने बालदिंडीला महाप्रसाद देण्यात आला. ज्ञानोबा तुकारामांचा जयघोषा बरोबरच दिंडीमध्ये ‘राधा राधा कृष्ण राधा ”म्हणत मुला मुली तसेच शिक्षिका यांनी फुगड्या खेळत दिंडीची शोभा वाढवली.
बालदिंडीचे आयोजन मुख्याध्यापक नानासाहेब वाघमोडे यांच्या सहकार्याने शरद भोसले, लतिका गोरे, महादेव साठे, वर्षा पताळे, रुक्साना तांबोळी, रेणुका साठे, स्मिता वाघे, संजय वाघमारे, संगीता गोसावी, संगीता ढोण यांनी केले. मृदुंग साथ शिवछत्रपती भजनी मंडळ भोसले नगरचे विठ्ठल भोसले यांनी केली.