क्वालालंपूर – भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू आणि देशबांधव एचएस प्रणॉय यांनी गुरुवारी सरळ गेममध्ये विजय मिळवत मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला.
सातव्या मानांकित सिंधूने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील लढतीत जागतिक क्रमवारीत 32व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झांग यी मॅनचा 21-12, 21-10 असा अवघ्या 28 मिनिटांत पराभव केला. आता सिंधूची तैपेईच्या ताई त्झू यिंगसोबत लढत होणार आहे. सिंधूचा जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या यिंग विरुद्ध 5-16 अशी निराशाजनक कामगिरी आहे.
पुरुष एकेरीच्या स्पर्धेत प्रणॉयने तैपेईच्या वांग त्झू वेईचा 21-19, 21-16 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता त्याचा सामना जपानच्या कांता त्सुनेयामशी होणार आहे.
दरम्यान, बी. साई प्रणीत आणि माजी राष्ट्रकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यप हे स्पर्धेतून बाहेर पडले आहे. प्रणीतला चीनच्या ली शे फेंगकडून 42 मिनिटांत 14-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला, तर कश्यपला सहाव्या मानांकित इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंगने 10-21, 15-21 असे हरवले.