नवी दिल्ली: केरळमधील एका वृद्ध दाम्पत्याने कोरोना बाधेपासून मुक्ती मिळवली आहे. त्या दाम्पत्याने जगभरात हाहाकार उडवणाऱ्या विषाणूच्या संसर्गावर केलेली मात आशेचा किरण ठरला आहे.
केरळमधील 93 आणि 88 वर्षे वयाच्या दाम्पत्याला करोनाची बाधा झाल्याचे आढळले. त्या दाम्पत्यावर केरळमधील रूग्णालयात उपचार करण्यात आले. काही दिवस त्या दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, कोरोनावर मात करून ते दाम्पत्य पूर्ण बरे झाले. त्या घडामोडीकडे काही वैद्यकीय तज्ञ चमत्कार म्हणून पाहत आहेत. त्याचे कारण म्हणजे, जगभरात कोरोनाचे बळी ठरलेल्यांत वृद्धांची संख्या मोठी आहे.
त्यामुळे प्रकृतीतील सुधारणा नेहमीच शक्य असल्याचा संदेश केरळमधील वृद्ध दाम्पत्याने दिल्याचे काही तज्ञांना वाटत आहे. त्या दाम्पत्याचे करोनामुक्त होणे काही तज्ञांना दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण वाटत आहे. तर, काही जण केरळमधील प्रभावी उपचार पद्धतीची प्रशंसा करत आहेत. अर्थात, केरळमधील वृद्ध दाम्पत्यामुळे आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांपर्यंत आणि रूग्णांपर्यंत सकारात्मक संदेश जाणार असल्याविषयी सर्वांचेच एकमत आहे.