पुणे – कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदान होणार आहे. यात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात थेट लढत असून, एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात होत आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारीच गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथून मतदानाचे साहित्य कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आले. कसबा पेठ मतदारसंघात सर्व मतदान केंद्रांवर दुपारपासून अधिकारी पोहचण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज केली आहे. प्रत्येकी 10 याप्रमाणे 27 टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली कामासाठी 27 पथके राखीव आहेत. मतदानादिवशी बंदोबस्तासाठी 600 पोलीस कर्मचारी व 83 अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
कर्मचाऱ्यांना पगारी सुटी किंवा दोन तास सवलत
ज्या मतदारसंघात ही निवडणूक होत आहे, तेथे कायद्यानुसार सर्व संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुटी देणे बंधनकारक आहे. किंवा मतदान कालावधीत 2 तास सवलत देणे बंधनकारक आहे. त्यामुळे जास्तीतजास्त संख्येने नागरिकांनी मतदान करावे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यादृष्टीने हे आदेश बजावण्यात आले आहेत.
टपाली मतदानाची सुविधा
निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी 54 कर्मचारी कसबा पेठ मतदारसंघातील मतदार आहेत. त्यांच्यासाठी साहित्य वितरण ठिकाणी टपाली मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान या 54 कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठीचे अर्ज देण्यात आले होते. त्यानुसार आज संबंधित कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान प्रक्रिया दृष्टीक्षेपात
2 लाख 75 हजार 689 : मतदार
270 केंद्रांवर : मतदान प्रक्रिया
1,250 : अधिकारी-कर्मचारी नियुक्त
600 पोलीस कर्मचारी व
83 अधिकारी
कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था
मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना पीएमपीच्या 43 बसेस, 7 मिनीबस आणि 10 जीपची व्यवस्था करण्यात आली होती.