Bollywood : बॉलीवूडमधील सुपरहिट ठरलेला एक चित्रपट म्हणजे ‘कल हो ना हो’. या सिनेमात अभिनेता शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आजही या चित्रपटाची प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी जादू निर्माण केली आहे. आजही या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आज या चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त निर्माता करण जोहरने (Karan Johar) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
करण जोहरने या चित्रपटातील काही क्षणांचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच या व्हिडिओद्वारे करणने वडिलांबाबत भावुक पोस्ट देखील लिहिली आहे. करण लिहितो, “या चित्रपटाचा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी खूपच भावनिक होता. आज अनेक वर्ष उलटून गेली तरी प्रत्येकाच्या मनात ‘कल हो ना हो’च्या आठवणी ताज्या आहेत. उत्तम कथानक, तगडी स्टारकास्ट या चित्रपटात सर्वकाही होतं. फक्त कलाकारांचं नव्हे तर या चित्रपटासाठी कॅमेऱ्यामागे काम करणाऱ्या प्रत्येकाचं खूप खूप अभिनंदन!”
View this post on Instagram
“माझ्यासाठी हा चित्रपट फार जवळचा आहे कारण, या चित्रपटानिमित्त मी आणि माझ्या वडिलांनी धर्मा प्रोडक्शनसाठी शेवटचं एकत्र काम केलं होतं…हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. आजही चित्रपट पाहताना त्यांचं अस्तित्त्व मला प्रत्येक सीनच्या फ्रेममध्ये जाणवतं. बाबा खूप खूप धन्यवाद…आम्हाला प्रत्येक गोष्टी मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप आभार! तुम्ही नेहमी खऱ्याच्या बाजूने उभे राहिलात…तुमची मला कायम आठवण येते…” असे करणने पोस्टमध्ये लिहिले आहे.
याशिवाय त्याने ‘कल हो ना हो’च्या दिग्दर्शकाचेही आभार मानले आहेत. ‘धन्यवाद निखिल दिग्दर्शक म्हणून हा तुझा पहिलाच चित्रपट होता आणि तुला आयुष्यभर पुरेल एवढं प्रेम या चित्रपटामुळे मिळालं. एवढ्या सुंदर चित्रपटासाठी तुझेही खूप खूप आभार.” असे करणने म्हंटले आहे. दरम्यान, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट जवळपास 28 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 38.85 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटात जया बच्चन, दारा सिंह, सतीश कौशिक, झनक शुक्ला आणि सोनाली ब्रेंद्रे यांसारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.