पिंपरी, दि. 29 – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात 8 ते 10 हजार लोकसंख्या असलेला भाग, झोपडपट्टी, दाट मनुष्यवस्ती, चाळी, 1 किलो मीटर अंतरावर महापालिका रुग्णालय, दवाखाना उपलब्ध नाही, अशा ठिकाणी जिजाऊ क्लिनिक सुरू केले जाणार आहे. शहरातील विविध भागात पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी जिजाऊ क्लिनिक उभारण्यात येणार आहे. यासाठी स्थापत्य विषयक कामांसाठी 1 कोटी 57 लाख 47 हजार रूपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंगळवार (दि.29) रोजी मान्यता दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये 8 रुग्णालये आणि 27 दवाखाने कार्यरत आहेत. 750 खाटांच्या क्षमतेचे सर्वात मोठे वायसीएम रुग्णालयासह नवीन आकुर्डी, जिजामाता, थेरगाव, भोसरी अशी सुस्सज, अत्याधुनिक रुग्णालये आहेत. या रुग्णालये, दवाखान्यांमध्ये नागरिकांवर उपचार केले जातात. महापालिकेने सीएसआरच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील वैद्यकीय पायाभूत सुविधांचे मेडिकल गॅप ऍनालिसिस केले आहे. पायाभूत वैद्यकीय सुविधा महापालिकेच्या विविध भागामध्ये जिजाऊ क्लिनिक सुरु करण्याचे धोरण आहे. यामुळे शहरातील नागरिकांना लहान-मोठ्या आजारांवर घराजवळ तत्पर उपचार मिळण्यास फायदा होणार आहे.
शहरातील विविध भागात पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी जिजाऊ क्लिनिक उभारण्यात येणार आहे. यासाठी स्थापत्य विषय कामे करण्यासाठी पालिकेने निविदा मागविली होती. यामध्ये मे. पी. एन. नागणे आणि श्री गणेश कन्स्ट्रक्शन यांनी निविदा सादर केली. मात्र, मे. पी. एन. नागणे यांनी 20.92 टक्के कमी दराने निविदा सादर केली. मूळ खर्च 1 कोटी 54 लाख 99 हजार 838, रॉयल्टी चार्जेस 54 हजार 45 आणि मटेरियल टेस्टींग चार्जेस 1 लाख 93 हजार 300 असे 1 कोटी 57 लाख 47 हजार रूपये अदा करण्यास मान्यता दिली आहे. तसेच नागणे यांना नियमानुसार व निविदेतील निविदा अटीप्रमाणे त्यावरील वस्तु व सेवा कर अदा करण्यास, निविदा अटींनुसार भाववाढ लागू करण्यास तसेच बेसिक दरामध्ये कंत्राट कालावधीमध्ये झालेली वाढ, घट दरानुसार फरकाची रक्कम अदा किंवा वसुल करण्यास मंजुरी दिली आहे. नागणे यांनी हे काम चार महिन्यात पूर्ण करायचे आहे.
जिजाऊ क्लिनिकचे फायदे!
परिसरातील नागरिकांसाठी पर्याप्त आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध
रुग्णांची तपासणी व आवश्यक औषधे उपलब्ध
नागरिकांना घराजवळच प्राथमिक उपचार मिळाल्याने रुग्णालय, दवाखान्यावरील ताण कमी होणार
रुग्णांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा, सुविधा पुरविणे शक्य
गरीब नागरिकांना लवकरात-लवकर उपचार देणे शक्य होईल
शासनामार्फत आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या सेवा पुरविणे शक्य होईल